*💥🌼दिनविशेष🌼💥*
*रॉबर्ट एडवर्डस्*
*नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र*
*स्मृतिदिन - १० एप्रिल २०१३*
सर रॉबर्ट एडवर्डस् (२७ सप्टेंबर १९२५ - १० एप्रिल २०१३) हे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र होते. त्यांना "आयव्हीएफ' (IVF) तंत्राचा उपयोग करून टेस्टट्यूब बेबी जन्माला घालण्याच्या संकल्पनेचे प्रणेते समजले जाते. त्यांच्या व त्यांचे दिवंगत सहकारी पॅट्रिक स्टेप्टो यांच्या प्रयत्नांना १९७८ मध्ये यश येऊन जगातील पहिली टेस्टट्यूब बेबी ठरलेल्या लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता.
गर्भाशयाबाहेर कृत्रिम गर्भधारणा घडवुन आणल्याने वंध्यत्व असलेल्या बर्याच स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. कृत्रिम गर्भधारणा होऊन मुल जन्माला आले ते सर्वप्रथम इंग्लंडमध्ये. १९७८ मध्ये इंग्लंड येथे एडवर्ड आणि स्टेप्टो यांनी कृत्रिम गर्भधारणेने मुल जन्मल्याची माहिती जगाला दिली. १९८६ पर्यंत जगात ११००० मातांमध्ये यापद्धतीने गर्भधारणा झाली होती. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने जन्माला येणार्या मुलांना टेस्ट ट्युब बेबी असे म्हटले जाते.
या पद्धतीत काय करतात ते अाता पाहु. सर्वप्रथम स्त्रीच्या बिजांडातुन बीज काढले जाते. तिच्या पतीच्या शुक्राणुबरोबर नियंत्रित अशा प्रयोगशाळेतील परिस्थितीत त्या बीजाचा संयोग घडवुन आणला जातो. नंतर हे फलन झालेले अंडे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. तेथे ते रुजते व त्यानंतर नैसर्गिकरीत्या जशी वाढ होते, त्याप्रमाणेच गर्भाची वाढ होते. प्रसूतीही नेहमीप्रमाणे होते. मूल ९ महिने ९ दिवस परीक्षानळीत वाढत नाही; हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.
मासिक पाळीच्या चक्रात बीजांडातुन स्त्रीबीज बाहेर येते. ते गर्भाशयाच्या दोन नलिकांद्वारे ओढुन घेतले जाते. नंतर या नलिकांमध्ये शुक्राणु व स्त्रिबीज यांचे मिलन होते. या नलिका जर रोगग्रस्त वा खराब झालेल्या असतील, तर स्त्रीला वंध्यत्व येते. अशा वंध्यत्वात टेस्ट ट्युब बेबी या पद्धतीचा खुपच उपयोग होतो व मातृत्वाला पारख्या होणार्या स्त्रियाही मुलाला जन्म देऊ शकतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा