*💥🌸दिनविशेष🌸💥*
*राॅबर्ट वॅटसन*
*'रडार'च्या संशोधनात विकासात्मक सहभाग*
*जन्मदिन - १३ एप्रिल १८९२*
प्रतिध्वनीचे तत्त्व वापरून रडारची निर्मिती केली गेली आहे. १९३५ साली रॉबर्ट वॉटसन - वाॅट यांनी पहिली रडार यंत्रणा वापरात आणली. ही यंत्रणा मुख्यत: विमानांचा शोध ती दूरवर असतानाच घेण्यासाठी तयार केली गेली होती. अत्यंत वेगाने येणारे शत्रूचे विमान दूरवर असतानाच त्याबद्दलची माहिती या पद्धतीने मिळू लागली. आज याच यंत्रणेचा वापर सर्व ठिकाणी अज्ञात गोष्टींचा ठावठिकाणा घेण्यासाठी केला जातो.
रडार म्हणजे *रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग.* रेडिओ लहरींचा वापर करून ही यंत्रणा काम करते. अर्थातच दृश्य स्वरूपात वस्तू दिसण्याची गरज त्यामुळे राहत नाही. धुळ, धुके, पाऊस, रात्र वा अंधार या कशाचाही या यंत्रणेवर परिणाम होत नसल्याने ही अत्यंत उपयोगी व खात्रीलायक यंत्रणा म्हणून समुद्रावरील बोटी, विमाने, क्षेपणास्त्रे यांसाठी वापरली जाते.
रडारचे काम रेडिओलहरींद्वारे चालते. सर्व दिशांना सातत्याने पाठवल्या जाणाऱ्या रेडिओलहरी एखाद्या वस्तूवर (विमानावर) आदळतात. त्यांतील परतणार्यांतील काही पुन्हा ग्रहण केल्या जातात. या परतणार्या लहरींचे, विद्युतभारातून प्रकाशात रूपांतर केले जाते. गोलाकार पडद्यावर चमकदार प्रकाशकण अशा स्वरूपात हे रूपांतर रडार वापरणार्याला दिसते. रेडिओलहरींचे प्रक्षेपण व ग्रहण यांमधील कालावधी मोजून ग्रहणकेंद्र व वस्तू यातील अंतर मोजले जाते. सेकंदाचा हजारावा भाग जर यासाठी लागत असेल, तर विमान दीडशे किलोमीटरवर आहे, असा हिशोब केला जातो. अर्थातच यामुळे मिळणार्या सूचनेमुळे त्या विमानाचा समाचार घेणे किंवा जनतेला त्यापासून सावध करणे सहज शक्य होते. रडारची सूचना व विमान पोहोचणे या दरम्यान सहसा पंधरा ते वीस मिनिटे सहज मिळू शकत असल्याने त्याचा खूपच फायदा होऊ शकतो.
रडारवर दिसणारा ठिपका, त्याची तीव्रता, स्पष्टता व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचा 'बीप' असा संदर्भ या सर्वांवरून दिशा, गती, उंची यांचा खुलासा कॉम्प्युटरमुळे सध्या झटकन मिळू शकतो. विमानात बसवलेल्या रडारमुळे समोरून येणारी विमाने, विमानतळावरील यंत्रणा, हवेतील वादळे, टाळायला आवश्यक असलेले ढग किंवा पर्वतशिखरे यांचा पत्ता विमानातील नेव्हिगेटरला लगेच लागतो. बोटीवर पाण्यातील पातळीवर लहरींचे प्रक्षेपण करून निर्वेध प्रवास चालू राहतो. अनेकदा दाट धुक्यामध्ये वेगात बोट चालवणेही रडारमुळे शक्य झाले आहे.
रडारचा वापर सुरू झाला आणि अचानक होणारे विमानांचे हल्ले थांबले. जागरूक रडार यंत्रणेमुळे वैमानिक व शत्रूची रडार यंत्रणा या दोघांनाही एकमेकांचे अस्तित्व कळले आहे, हे आता प्रथम लक्षात येते. या प्रकारावर मात करण्यासाठी रेडिओलहरीच शोषुन घेतल्या जातील, असे द्रावण वा असा पृष्ठभाग शोधण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. त्याला अंशतः यश मिळाले आहे. पण व्यावहारिक उत्पादन अजून जमलेले नाही. प्रचंड वेग, कमी उंची व असा पृष्ठभाग यांचे एकत्रित स्वरूप करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. अर्थात हे सर्व लष्करी स्वरूपाचे प्रयत्न आहेत.
रडारची यंत्रणा, तिची माहिती गोळा करण्याची क्षमता व पल्ला हा ठराविक असतो. त्यामुळे सरहद्दीवर अनेकदा रडार यंत्रणेचे सक्षम जाळे बसवले जाते. या जाळ्याला भेदून एखादे अज्ञात विमान जेव्हा प्रवेश करते, तेव्हा सारी संरक्षण यंत्रणा तातडीने जागी होण्याची व्यवस्था जागरूक देशात केली जाते. भारतातही या स्वरुपाची यंत्रणा सर्व सरहद्दींचे सतत जागरूकपणे रक्षण करत असते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा