शुक्रवार, ५ जून, २०२०

5 जून जागतिक पर्यावरण दिन


💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
     
५ जून*

*🌳जागतिक पर्यावरण दिवस🌴*

पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.
१९७२ साली युनोच्या  सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन  सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे! २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे!
५ जून १९७२ रोजी पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतासह एकूण १३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. परिषदेत पर्यावरणविषयक जाहीरनामा काढण्यात आला. पर्यावरण रक्षण ही मानवाची जबाबदारी आहे, हे मान्य करून शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण हा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने सर्व देश दर वर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा करू लागले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरण शिक्षणाचा आराखडा 18 डिसेंबर 2003 ला तयार करण्यात आला. आपल्याकडे पर्यावरण हा विषय पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गात शिकवला जाऊ लागला. दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा होऊ लागला. परंतु प्रत्यक्षात हा विषय कृतीमध्ये उतरविला गेला नाही.

आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिच्यावर जी प्राकृतिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला 'पर्यावरण' असे म्हणतात. मानवाकडून कळत-न-कळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केल्या जाणाऱ्या अयोग्य कृतीमुळे नैसर्गिक परिस्थितीमध्ये जो बिघाड निर्माण केला जातो, त्याला 'प्रदूषण' म्हणतात. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये सुमारे दोनशे कायदेही समाविष्ट करण्यात आले परंतु त्यांची अंमलबजावणी पाहिजे तशी झाली नाही. वन्यजीवन संरक्षक कायदा १९७२मध्ये करण्यात आला. पाण्याचा प्रदूषण नियंत्रणाचा कायदा १९७४ मध्ये करण्यात आला. जंगलाच्या संवर्धनाचा कायदा १९८०मध्ये करण्यात आला. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ मध्ये करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा कायदा १९८२मध्ये करण्यात आला. हे सर्व उत्तम कायदे कागदावरच राहिले आहेत. वर्षभरात हे कायदे मोडणाऱ्या किती लोकांवर कोणती कारवाई झाली, याची माहिती लोकांपर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे.

सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरुकपणे पाहणे आणि या चळवळीत सर्वांना सामील करून घेऊन आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक सवयच झाली पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने केले जाण्याची जरूरी आहे. समाज प्रबोधन केले की काही उद्दीष्टे साध्य होतात, याची दोन उदाहरणे सहजपणे सांगता येतील. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात फटाके लावले तर ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण कसे होते, हे जेव्हा शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले तेव्हा मागील चार वर्षांपासून फटाक्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून आले. एक वर्षी पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी 'सुकी होळी खेळा' हा संदेश लोकांना दिला गेला तेव्हा लोकांनी तसे करून दाखविले.

ठाणे शहरात रस्तारूंदीकरण, पूल बांधणीसाठी बरेच वृक्ष तोडले जात आहेत. मी जेव्हा निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की अगोदर काहीतरी करून हे हिरवेगार वृक्ष सुकवले जातात. मग तोडले जातात. काहीवेळा अगोदर फांद्या तोडल्या जातात मग मुळासकट वृक्षच नाहिसा केला जातो. ही गोष्ट इतक्या बेमालूम पद्धतीने केली जाते की जनसामान्यांच्या ती लक्षातही येत नाही. वृक्षांची संख्या कमी झाली त्यामुळे चिमण्या, कावळे इत्यादी पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु आज या तलावांची स्थिती पाहिली की खूप दु:ख होते.

भूप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. ही पृथ्वी जशी माणसांची आहे तशीच ती वृक्ष, पशु, पक्षी इत्यादींचीही आहे. प्राचीन कालीही आपल्या भारतातील ऋषी-मुनींनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले होते. संत तुकारामांनी 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे' या शब्दांत मानवाचे निसर्गाशी असलेले दृढ नाते सांगितले होते. ज्यादिवशी पुस्तकात असलेल्या पर्यावरणासंबंधीच्या या गोष्टी आपण कृतीमध्ये उतरवू, त्याच दिवशी आपणास पर्यावरण दिन साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल.
========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा