=======================
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
*शास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम(ओम)*
यांचा आज स्मृतिदिन*
(जन्म: १६ मार्च, १७८९,मृत्यू: ६ जुलै, १८५४)
व्यवसायाने शिक्षक असलेले जॉर्ज सायमन ओहम हे जर्मन देशाचे थोर पदार्थ वैज्ञानिक आणि गणित तज्ञ होते. अध्यापानासोबत त्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करण्याची आवड होती. इटलीच्या अलेस्सान्द्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या कार्याचा प्रभाव ओहोम यांच्यावर होता. विद्युतरासायनिक घट (इलेक्ट्रोकेमिकल सेल) ची क्षमता आणि धातू, अधातू यांची विद्युत वाहकता संदर्भातील ओहोमचे प्रयोग आजही प्रसिद्ध आहेत. विद्युत-वहन संदर्भात ओहोमनी त्यांच्या प्रयोगाद्वारे 'विद्युत धारा आणि विभवांतर या एकमेकीशी समप्रमाणात असतात' हा नियम प्रस्थापित केला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ विद्युत-प्रतिकार-शक्ती (इलेक्ट्रिक रेझीसटन्स) मापन एककासाठी 'ओहोम' असे नाव दिले आहे.
*आज 6 जुलै या थोर शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या विषयीचा ही माहिती.*
जॉर्ज सायमन ओहम यांचा जन्म 16 मार्च 1789 रोजी एरल्यानजेन येथे झाला. जोहान्न उल्फ उल्फ्गंग हे त्यांचे वडील आणि मारिया एलिझाबेथ बेक्क हि त्यांची आई. आई वडिलांचे कोणतेही औपचारिक शिक्षण नव्हते. वडील कुलूप बनविणे आणि त्यांची दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करायचे (व्यवसायाने वडील लॉकस्मिथ होते). ओहोम दहा वर्षाचा होता तेंव्हाच आईचे निधन झाले. जोहान्न उल्फ उल्फ्गंग स्वत: ओहोमचा सांभाळ केला. राहत्या गावी ओहोमला शिक्षण पूर्ण करता आले. बालपणी ओहोमचे वडील त्याला दररोज व्यायाम शाळेत घेऊन जायचे. तेथे ओहोमाची भेट झाली कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ या प्राध्यापक व्यक्तिमत्वाची. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ हे एरल्यानजेन विद्यापीठात पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ आणि ओहोमचे यांच्यात सख्यत्व निर्माण झाले. पदार्थ विज्ञानातील प्राथमिक स्वरूपाचे धडे ओहोमनी बहुतेक प्रा. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यायाम शाळेतच गिरविले असतील. वडीलासोबत ओहोम नेहमी वीज, वीज वाहकता, आणि त्याचे उपयोग या विषयावर गप्पा मारायचा.
पदवी शिक्षणानंतर सप्टेंबर 1806 मध्ये ओहोम स्विझरलॅंडच्या गॉत्सडट बेई निडाऊ येथील एका शाळेत शिक्षक पदावर कार्यरत झाला. त्यानंतर म्हणजे 1809 मध्ये प्रा. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांची बदली आणि पदोन्नती हेडल्बर्ग विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभाग प्रमुखपदी झाली. पुढील उच्च शिक्षणासाठी आपणही हेडल्बर्ग विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागात जावे असे ओहोमला (आणि त्याच्या वडिलांना सुद्धा) वाटायचे. आपली नोकरी करतच आपण बहिस्थ स्वरूपाचे शिक्षण घ्यावे हा कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांनी दिला. युलर, लाप्लास आणि लक्रोइक्स यांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करण्यासाठी कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांनी ओहोमला सल्ला दिला. पदार्थ विज्ञान आणि गणित विषयातील सर्वोच्च अध्ययन करण्याची ओहोमची आशा होती. याच दरम्यान ओहोमच्या वडिलांचे निधन झाले. मार्च, 1809 मध्ये ओहोम गॉत्सडट बेई निडाऊ येथील शिक्षकाची नोकरी सोडली आणि खाजगी शिकवणी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे ठरविले. सलग दोन वर्षे त्यांनी या खाजगी शिकवणी शिक्षकाची भूमिका बजावली.
1811 मध्ये ओहोम एरल्यानजेन विद्यापीठात गणित संशोधन विद्याभ्यासाठी दाखल झाला. गणितीय संकल्पना, विशिष्ठ सूत्रात मांडणी करून त्याचे विद्युत शास्त्रासाठी उपयोग करण्या संदर्भातील उल्लेखनीय अभ्यासाकरिता एरल्यानजेन विद्यापीठानी 25 ऑक्टोबर 1811 रोजी ओहोमला डॉक्टरेट पदवी बहाल केली. ओहोमच्या या उल्लेखनीय संशोधन कार्याच्या गौरवार्थ एरल्यानजेन विद्यापीठानी दोन वर्षाकरिता ओहोमला गणित विषयाच्या प्राध्यापक पदी रुजू करून घेतले. 1813 साली बावरिया सरकारनी ओहोमला सरकारी प्राध्यापक पदासाठी निमंत्रण दिले. फेब्रुवारी 1816 पर्यंत ओहोम सरकारी प्राध्यापक पदाचे काम पहिले. त्यानंतर बावरिया सरकारनी, ओहोमला बाम्बार्गच्या शालेय गणिताची प्रत सुधार कामासाठी पाठविले. 11 सप्टेंबर 1817 रोजी ओहोमच्या प्रयत्नामुळे बाम्बार्गच्या शालेय गणिताची प्रत सुधारल्याची बावरिया सरकारनी मान्य केले. गणितासोबत ओहोमनी बाम्बार्गच्या शालेय पदार्थ विज्ञान या विषयाची सुद्धा प्रत सुधारावी अशी अपेक्षा बावरिया सरकारनी व्यक्त केले. हेही आव्हान ओहोमनी स्वीकारले.
बावरिया सरकारनी ओहोम आता गणित आणि पदार्थ विज्ञान या दोनही विषयाचा तज्ञ असल्याचे मान्य केले. ओहोमचे अथक प्रयत्न आणि बावरिया सरकारची आर्थिक पाठबळ यामुळे बाम्बार्गची शाळा आता विज्ञान शाळा म्हणून प्रसिद्धीस आली. याच शाळेत ओहोमनी प्रयोगशाळेत यांत्रिक उपकरणे बनविली आणि पदार्थ विज्ञानातील गॅल्व्हानिक सर्किट गणितीय सूत्रात मांडणी केलेले संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर) प्रसिद्ध केले. या संशोधनाच्या गौरवार्थ 1852 मध्ये म्यूनीच विद्यापीठांनी ओहोमला प्रायोगिक पदार्थ विज्ञान विभाग प्रमुखपदी पाचारण केले. ओहोमनी म्यूनीच विद्यापीठांच्या प्रायोगिक पदार्थ विज्ञान विभागामध्ये विद्युत शास्त्रातील अनेक प्रयोग केले. इटलीच्या अलेस्सान्द्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या कार्याचा प्रभाव ओहोमवर होता. विद्युतरासायनिक घट (इलेक्ट्रोकेमिकल सेल) ची क्षमता आणि धातू अधातू यांची विद्युत वाहकता संदर्भातील ओहोमचे प्रयोग प्रसिद्ध आहेत. विद्युत-वहन संदर्भात ओहोमनी त्याच्या प्रयोगाद्वारे विद्युत धारा आणि विभवांतर या एकमेकीशी समप्रमाणात असतात (संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते) हा नियम प्रस्थापित केला. अशा थोर शास्त्रज्ञाचे 6 जुलै 1854 रोजी निधन झाले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ विद्युत-प्रतिकार-शक्ती (इलेक्ट्रिक रेझीसटन्स) मापन एकासाठी ओहम असे नाव दिले आहे.
---प्रा. विठ्ठलराव ख्याडे
*========================*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा