शनिवार, ११ जुलै, २०२०

1 जुलै


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        
       *वसंतराव नाईक*

      *हरितक्रांतीचे प्रणेते*

*जन्मदिन - १ जुलै १९१३*

वसंतराव नाईक (०१ जुलै. १९१३: पुसद, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - इ.स. १८ ऑगस्ट १९७९)

        आज १ जुलै, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

कृषी विद्यापीठामार्फत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केल्यामुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती होऊ शकली. त्यातूनच वसंतराव हरितक्रांतीचे प्रणेते ठरले.
वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे स्थापन केली. चार कृषी विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांनी दर्जेदार बियाणे निर्माण केले. या बियाणांमुळे कृषिक्षेत्रात नवी क्रांती झाली. धान्य उत्पादन वाढले. एकाच वेळी धवल व हरितक्रांती घडवून आणण्याचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांना जाते.
वसंतराव नाईक यांच्यात आधुनिक महाराष्ट्र कसा घडवायचा हा दृष्टिकोन होता. आज आणली जात असलेली अन्नसुरक्षा योजना वसंतराव नाईकांनी त्याकाळी मांडली होती.

नाईकांनी अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले आणि राज्यभर तुफानी दौरे करुन शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. संकरीत बियाणांचा वापर करायचे शेतकऱ्यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या गहुली व शेलू येथील शेतीत संकीरत बियाणांची मोठय़ा प्रमाणावर लागवड त्यांनी केली. त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाणांचा प्रचार तडकाफडकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाणांच्या लागवडीखाली होती, ती ५०,००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकांच्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणात यश येत होते. याच वेळी अमेरिकेने पीएल 480 करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला आणि ते पुण्याच्या शनिवार वाडय़ासमोर गरजले, ‘महाराष्ट्र जर येत्या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या.’ त्यांचे हे आवाहन स्वीकारुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली व महाराष्ट्र आणि पुढे देशसुध्दा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले.

जो देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी बनला होता तो स्वावलंबी झाला ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांनाच निर्माण झाली.हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युध्दाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले. बलाढय़ शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुध्दा त्या काळात जे शक्य झाले नाही ते भारताने करून दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्यावतीने व डॉ. बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मक्याच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात नाईकांचा मोठा वाटा होता.

१९७२ च्या दुष्काळाचा सामना करतांना नाईकांनी जे परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. या दुष्काळामधूनच क्रांतकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी आणि क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर नरेगा च्या नावाने सुरु केली आहे. यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरु करणाऱ्या ह्या महान नेत्यांचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतानाही एवढी मोठी कोटय़ावधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतानाही तत्कालीन विरोधीपक्ष नेते कृष्णराव धुळुप आणि इतर सर्व विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली.

नाईकांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या प्रयत्नातूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बाध बंधाऱ्यांची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, या सारख्या कृषी क्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात. नाईकांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. नाईकांनी शेती व शेतकर्यांवर जसे प्रेम केले तसेच पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला. आज नाईकांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ह्या महानायकास विनम्र अभिवादन.
*========================*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा