*🌸विल्यामिना फ्लेमिंग🌸*
*अंतरिक्षशास्त्रज्ञ*
*ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित केली*
*जन्मदिन - १५ मे १८५७*
विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग (१५ मे, इ.स. १८५७:डंडी, स्कॉटलंड - २१ मे, इ.स. १९११:बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका) ही स्कॉटलंडमध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली.
फ्लेमिंग स्कॉटलंडमध्ये शालेय शिक्षिका होती. २१ वर्षांची असताना ती आपल्या पतीबरोबर बॉस्टनला स्थलांतरित झाली. येथे आल्यावर तिने हार्वर्ड कॉलेज वेधशाळेच्यानिदेशक एडवर्ड चार्ल्स पिकरिंग यांच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. तिच्या शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञानाने प्रभावित होउन पिकरिंगने फ्लेमिंगला आपल्या वेधशाळेत नोकरी देऊ केली व ताऱ्यांच्या प्रकाशपटलांचा अर्थ लावण्याचे शिकविले. त्या आधारावर फ्लेमिंगने ताऱ्याच्या प्रकाशपटलातील उदजनाच्या प्रमाणावरून शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित केली. याशिवाय तिने १०,०००पेक्षा तारे, ३९ तारकामेघ, ३१० अस्थिर तारे आणि १० नोव्हा बद्दलच्या शास्त्रीय माहितीची नोंद केली. १८८८साली फ्लेमिंगने होर्सहेड तारकामेघ शोधला. सुरुवातीला तिला याचे श्रेय देण्यात आले नव्हते. १९०८मध्ये फ्लेमिंगची ख्याती झाल्यावर तिले हे श्रेय देण्यात आले.
=========================+¥+=======
*विल्यमिना फ्लेमिंग*
*खगोलशास्त्रज्ञ*
*स्मृतिदिन - २१ मे १९११*
विल्यमिना फ्लेमिंग यांचे गुरू एडवर्ड चार्ल्स पिकेरिंग यांनी त्यांच्याकडे अवकाश निरीक्षणाचं गणकीय काम करणाऱ्या (मेल कॉम्प्युटर्स) पुरुष सहकाऱ्यांवर वैतागून ''माझ्याकडची स्कॉटिश मेड हे काम जास्त चांगलं करू शकेल'' असं उपरोधाने म्हटलं खरं; पण त्यांचं तेच म्हणणं विल्यमिना फ्लेमिंग यांनी अनेक ताऱ्यांच्या वर्णपटावरून त्यांचं वर्गीकरण तसंच हॉर्सहेड नेब्युलाच्या शोधातून कसं सिद्ध केलं ते आपण आधीच्या लेखात वाचलं.
खगोल अभ्यासाच्या क्षेत्रात आल्यावर स्वतःच्या संशोधनाबरोबरच फ्लेमिंग यांनी अधिकाधिक महिलांचा समावेश करण्याचं धोरण स्वीकारलं. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरचा काळ लक्षात घेता युरोप-अमेरिकेतही सामाजिक प्रगल्भता बेताचीच होती. त्यातूनच महिलांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचे प्रकार घडत होते. याचा अनुभव फ्लेमिंग यांनी अश्वमुखी तेजोमेघाच्या संशोधनाच्या श्रेयाबाबत घेतलाच होता. गणकीय काम जर पुरुष करू शकतात तर महिला का नाही करू शकणार, या विचारातून फ्लेमिंग यांनी हार्वर्ड कॉलेज ऑब्झर्वेटरीमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गणकीय काम करणाऱ्या महिलांचा मोठा गट तयार केला. पिकेरिंग यांच्या विभागातल्या महिला कॉम्प्युटर असं त्यांना म्हटलं जायचं. तोपर्यंत कॉम्प्युटिंग किंवा गणकीय काम करणारी कॉम्प्युटर नावाची आता आपण वापरतो तशी यंत्रं कल्पनेतच होती.
१८८६मध्ये फ्लेमिंग यांच्या प्रेरणेने अनेक महिलांनी वेधशाळेतील नोंदी आणि संग्रहित माहितीचं (डेटा) गणिती विश्लेषण करून त्यात अचूकता आणि स्पष्टता आणण्याचं काम केलं. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे नंतरच्या काळात महिलांना अवकाश संशोधनाच्या वेधशाळेतील कामात सहभागी करून घेण्यातील आडकाठी दूर झाली.
स्वानुभवावरून शिकलेल्या फ्लेमिंग यांनी ठिकठिकाणी व्याख्यानं देऊन महिलांमध्ये जागृती केली. 'खगोल शास्त्रातील महिलांचे कार्यक्षेत्र' (ए फिल्ड फॉर वुमन्स वर्क इन ऍस्ट्रॉनॉमी) असाच त्यांच्या व्याख्यानाचा विषय असायचा. १८९३मध्ये जागतिक परिषदेत त्यांनी वेधशाळांमध्ये महिलांचा सहभाग असायलाच हवा असं आपलं म्हणणं ठासून मांडलं. महिलांना विविध कार्यक्षेत्रांत काम करण्याची संधी दिली तर त्यांना अमुक काम जमणार नाही ही प्रचलित समजूत नष्ट होऊन स्त्राr-पुरुष समानता येईल. कारण स्त्राrला दुय्यम समजण्याचा प्रकार पारंपरिक रूढीतून आला आहे. त्यांना जैविक रचनेचा आधार नाही. महिलाही पुरुषांइतक्याच कार्यप्रवण, सक्षम असतात अशा आशयाचा घणाघाती प्रचार त्यांनी केला. फ्लेमिंगचं हे म्हणणं सिद्ध करणाऱ्या यशस्वी महिला सहकारी त्यांना लाभल्या. १८९९मध्ये फ्लेमिंग हार्वर्ड वेधशाळेतील खगोलीय छायाचित्रण विभागाच्या प्रमुख (क्युरेटर) झाल्या. १९०६मध्ये त्यांना लंडनच्या प्रसिद्ध रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं मानद सदस्यत्व बहाल करण्यात आलं. लवकरच त्यांना वेलस्ली कॉलेजची फेलोशिपही प्राप्त झाली. मेक्सिको येथील ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनेही फ्लेमिंग यांचा त्यांनी केलेल्या ताऱ्यांच्या संशोधनाबद्दल अल्मेडॅरो पदक देऊन सन्मान केला. १९०७मध्ये महिला सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या संशोधनाचं फलित म्हणून फ्लेमिंग यांनी 'ए फोटोग्राफिक स्टडी ऑफ व्हेरिएबल स्टार्स' हे पुस्तक प्रसिद्ध केलं. १९१०मध्ये त्यांचं 'डिस्कव्हरी ऑफ व्हाईट ड्वार्फस्' (श्वेतखुजे तारे) झालं. त्याच सुमारास त्यांनी लिहिलेलं 'स्पेक्ट्रा ऍण्ड फोटोग्राफिक मॅग्निटय़ूड्स ऑफ स्टार्स इन स्टॅण्डर्ड रिजन्स' हे पुस्तकही १९११मध्ये नावाजलं गेलं. फ्लेमिंग यांच्या महिला सहकाऱ्यांनी केलेलं काम विस्मृतीत गेलं होतं, पण २०१५मध्ये क्युरेटर लिण्डले स्मिथ यांनी वेधशाळेच्या ऐतिहासिक नोंदीचं 'डिजिटायझेशन' करायचं ठरवलं तेव्हा महिला कॉम्प्युटरनी गोळा केलेल्या माहितीची (डेटा) प्रत्येकी २० ते ३० वह्या असलेली ११८ खोकी सापडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा