सोमवार, २७ एप्रिल, २०२०

🌼दिनविशेष🌼💥 28 एप्रिल

*💥🌼दिनविशेष🌼💥*
         *युजेन शुमाकर*

*'शुमाकर - लेव्ही ९' या धुमकेतुचा शोध*

*जन्मदिन - २८ एप्रिल १९२८*

युजेन शुमाकर हा एक भुगर्भशास्त्रज्ञ होता. त्याने आणि त्याची पत्नि कॅरोलिन शुमाकर दोघांनी *'शुमाकर - लेव्ही ९'* या धुमकेतुचा शोध लावला.
हा धुमकेतु जुलै १९९४ ला गुरु या  ग्रहावर आदळुन नष्ट झाला.

धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो.

धूमकेतू हे सुद्धा सूर्यमालेचाच भाग आहेत. आता बाकी ग्रह आणि धूमकेतू यांत अनेक दृश्य फरक आहेत आणि अनेक तांत्रिक फरक देखील आहेत. त्यातलाच एक फरक असा की सूर्यमालेतील ग्रह हे साधारण वर्तुळाकार आणि पृथ्वीसापेक्ष समतल कक्षेत फिरतात, पण धूमकेतू असल्या ग्रह-कक्षेच्या नियमांचे बांधील नाहीत. ते सूर्याभोवती लंब-वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि 'समतल' वगैरे गोष्टींना फाट्यावर मारतात. असे असले तरीही धूमकेतूसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी बांधलेले आहेत आणि म्हणूनच आपण हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी पाहू शकतो.

धूमकेतूच्या कक्षेबद्दल सांगण्याचा हेतू हा की धूमकेतूचा नैसर्गिक अविष्कार हा त्याच्या लंब-वर्तुळाकार कक्षेत दडलाय. धूमकेतू जेव्हा सूर्यापासून दूर असतो तेव्हा त्याच्यात आणि अवकाशातील इतर अ-ग्रहीय वस्तूंमध्ये फरक करणं मुश्कील होऊन बसतं. त्यावेळी त्याची निरपेक्ष तेजस्विता (absolute magnitude) ही साधारण +१० ते +१६ असते. तेजस्विता जितकी 'मायनस' तितकी ती जास्त असते आणि जितकी 'प्लस' तितकी ती कमी असते. आपला सूर्य -२६ तेजस्वीतेचा आहे. मानवी डोळ्यांनी कमीत कमी +६ तेजस्वितेचे ऑब्जेक्टस दिसू शकतात. आता इतक्या कमी तेजस्वितेचे हे धूमकेतू तर अतिशय ताकदवान दुर्बिणी घेऊनच बघावे आणि शोधावे लागतात. पण जसजसा धूमकेतू सूर्याच्या जवळ येऊ लागतो, सौरवात आणि किरणोत्सर्ग यामुळे त्यावरील बर्फ आणि वायूचे मिश्रण वितळू लागते, धूमकेतूच्या केंद्रकाभोवती तात्पुरते वातावरण निर्माण होते आणि पृष्ठभागावरील धूळ, बर्फ आणि वायू मिळून त्याला एक अतिशय सुंदर शेपटी दिसायला लागते. त्यावर कडी म्हणजे वायूंचे आयनीभवन (ionization) होऊन धूमकेतूला अजून एक शेपटी फुटते. या दोन शेपट्यांमध्ये फरक कसा ओळखायचा? तर, वायूंचे आयनीभवन होऊन बनलेल्या शेपटीला वस्तुमान नसल्यामुळे ती शेपटी थोडीशी फिक्कट आणि सरळ दिसते, तर धूळ, बर्फ, वायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली शेपटी ही किंचित वळलेली दिसते. तसेच प्रत्येक धूमकेतूची आयनीभवन झालेली शेपटी दिसेलच असे नाही, पण मुख्य शेपटी दिसतेच.

काही धूमकेतू हे नियमितपणे प्रदक्षिणा घालतात. काही धूमकेतूंच्या कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलतात, काही धूमकेतू हजारो वर्षांची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा दर्शन देतात. *शुमाकर-लेव्ही९ नावाचा धूमकेतू असाच भटकताना गुरूच्या कक्षेत सापडला, बरीच वर्षे त्याच्याभोवती फिरला, आणि नंतर १९९४ मध्ये गुरु वर आदळून नष्ट झाला.* असे अनेक धूमकेतू सूर्याजवळून जाताना सूर्यामध्ये खेचले जातात आणि नष्ट होतात. काही धूमकेतू अनंताच्या प्रवासाला निघून जातात. 'एन्के' सारखे धूमकेतू अतिशय वेगाने आणि अतिशय कमी वेळात प्रदक्षिणा पूर्ण करतात, पण त्यांचा वेग, वस्तुमान आणि अंत:स्थ ग्रहांना छेदून जाणारी त्यांची कक्षा यामुळे ते स्वत:चीच कक्षा आणि वेग बदलत राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा